पुणे पुणे होम

काळ आला होता…..पण वेळ आली नव्हती… वाकी हद्दीतील प्रकार,. अपघातातून बचावले कुटुंब,.

Share news

चाकण,    दि.    ( वार्ताहर ) –     पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भामा नदीच्या अलीकडील तीव्र वळणा वरील मोरीवरून एक मोटार खोल चारीत कोसळली. मात्र, केवळ नशीब बलवत्तर म्हणून मोटारीतील संपूर्ण कुटुंब या गंभीर अपघातातून बालंबाल बचावले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाकी ( ता. खेड,) गावच्या हद्दीत हा विचित्र अपघात झाला. या अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. काळ आला होता…पण वेळ आली नव्हती… याची प्रचिती या अपघातातून आल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

    तुषार दौलतराव शिंदे ( रा. पिंपळे सौदागर, पुणे.) हे त्यांची पत्नी व दोन मुली असे संपूर्ण कुटुंबाच्या समवेत मोटारीतून ( क्र. एम. एच. १४, ई. यु. ४५३२) पुण्याहून चाकण मार्गे पुढे नाशिक येथे जाण्यासाठी भरधाव निघाले होते. आज सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान नाशिक दिशेने जात असताना भामा नदीवरील पुलाच्या अगोदर रोहकल फाट्याजवळ वाकी गावाच्या हद्दीतील ओढ्याच्या पुला जवळील रस्त्यावर ऑईल सांडलेले होते. त्यामुळे मोटार कार चालकाचे मोटारी वरील नियंत्रण सुटले. मोरीवरील पुलाच्या कठड्याला धडकून मोटार खाली गेली. मात्र, सुदैवाने पुला खालील झाडा झुडपांमुळे मोटार खाली आदळली नाही. व  मोठा अनर्थ टळला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.. या म्हणीचा प्रत्यय यावेळी शिंदे कुटुंबाने अनुभवला.  

 जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तुषार शिंदे यांनी सांगितले कि, ” सदरच्या रस्त्यावरून नेहमी येणे – जाणे असते. मात्र, रस्त्यावर ऑईल सांडलेले असल्याने मोटार घसरली.  मोटारीतील सर्वांनी सीट बेल्ट लावलेले होते. नशीब बलवत्तर म्हणजे नेमके काय झाले, याचा प्रत्यक्ष प्रत्यय आल्याचेही त्यांनी सांगितले.”