Theft of unofficial hilltops from the murum mafia
ठळक बातम्या पुणे

मुरूम माफियांकडून अनधिकृतपणे टेकड्यांची लचकेतोड

Share news


चाकण, 03 जानेवारी 2019 :  दिवसेंदिवस प्रचंड वेगाने विस्तारणाऱ्या उद्योग पंढरीतील जमिनींना सोन्याचा भाव मिळू लागल्याने पैशाच्या आमिषाने चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी व परिसरात खूप मोठ्या प्रमाणात मुरूम माफियांकडून रात्रंदिवस विनापरवाना व अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या डोंगर व टेकड्यांची लचकेतोड सुरू आहे. मुरूम माफिया या माध्यमातून करोडो रुपयांच्या मुरुमांची अघोरी चोरी करत असूनही याकडे महसूल विभाग डोळ्यावर कातडी पांघरून गप्प बसल्याने यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोडी आणि खूप मोठ्या प्रमाणवर मांडवली होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुरूम माफिया अनधिकृतपणे व बेकादेशीररित्या मुरूम उपसा करून शासनाची मालमत्ता लुबाडत असतानाही मुरूम माफियांवर महसूल विभाग कुठलीच कायदेशीर व दंडात्मक कारवाई करत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.

     चाकण औद्योगिक क्षेत्रातील खराबवाडी व परिसरात संपादित केलेल्या व खासगी जागेतील भूखंडातून मुरूम माफियांकडून खूप मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस मुरूम उपसा सुरु आहे. दिवसा मुरूम उपसा करणे कठीण जात असल्याने रात्रीच्या अंधारात मुरूम वाहतूक केली जात आहे. मात्र, आर्थिक हितसंबंधांमुळे महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी बघून न बघितल्यासारखे करीत असल्याचा या भागातील नागरिकांचा व उद्योजकांचा आरोप आहे. शासकीय अथवा खासगी डोंगर, टेकड्या व मोकळ्या भूखंडातून मुरूम माफिया कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता बिनबोभाट श्रीखंड लाटत आहेत. महसूल विभाग या गंभीर बाबीकडे डोळेझाक कशासाठी करतोय ? ,हा गंभीर प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे. मात्र, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. 

    खराबवाडी प्रमाणे वाघजाईनगर, आंबेठाण, बिरदवडी, बोरदरा, कोरेगाव, महाळुंगे इंगळे, वासुली, शिंदे, वराळे तसेच चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोन मधील डोंगर, टेकड्या जमीनदोस्त करून मोठ्या प्रमाणावर डबर, दगड व मुरूम उपसून त्याची सर्रास व अवैधपणे विक्री केली जात असल्याचा या भागातील उद्योजक व नागरिकांचा आरोप आहे. कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता ही अवैध मुरूम वाहतूक सध्या जोरात सुरू आहे. दिवसाची मुरूम वाहतूक करणे कठीण होत असल्यामुळे रात्रभर मुरुमाची ही वाहतूक अवजड वाहनातून अवैधरित्या सुरु आहे. मुरूम माफिया यांच्याबरोबर महसुलाच्या काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचे यामध्ये आर्थिक हितसंबंध दडल्याने त्यांच्यावर कुठलीच कायदेशीर कारवाई होत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या धाडसी मुरूम उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, स्वतःचे हात ओले करण्यातच महसूल विभागाचे अनेक अधिकारी धन्यता मानत आहेत.

    चाकण व औद्योगिक भागात विनापरवाना मुरूम चोरी करून आणि मुरुमाची बेकायदेशीररित्या वाहतूक करताना अवजड वाहने ओव्हरलोड भरली जात असल्याने येथील रस्ते खूप मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. त्यामुळे शेजारील इंडस्ट्रीयल शेडला याचा मोठा धोका पोहचू शकतो. अनेक वेळा तर अवजड वाहने मंजूर क्षमतेपेक्षा दुप्पट भरून सर्रासपणे  वाहतूक केली जात आहे. त्यामुळे रस्त्याचे प्रचंड नुकसान होत आहे. याशिवाय रस्त्यावर मुरूम पडेपर्यंत वाहने भरली जात आहेत. त्यामुळे त्यावरून वाहने घसरून दुचाकी चालक, पादचारी तसेच चारचाकी वाहनांचा जीवघेणा अपघात होण्याचा संभव निर्माण झाला आहे.

आता बातमी, माहिती, मनोरंजन, दिनविशेष, तंत्रज्ञान, खेळ आणि नोकरी विषयक माहिती तुमच्या व्हाट्सअँप वर अगदी विनामूल्य मिळवा.

https://goo.gl/UFZBzk