जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

चळवळ भक्कम होण्यासाठी आंबेडकर डोक्यात भिनावेत -राजन खान यांचे परखड मत

Share news

सम्यक संमेलनात ‘समकालीन साहित्य चळवळी व बांधिलकी’वर परिसंवाद
पुणे : “आंबेडकर पूर्णपणे डोक्यात भिनल्याशिवाय व कृतीत उतरल्याशिवाय आंबेडकरी चळवळ भक्कम होणार नाही. नेत्यांनी व चळवळीतील कार्यकर्त्यांनी दुटप्पीपणा सोडून कट्टर आंबेडकरी विचार आणि त्याप्रमाणे आचरण होणे येथे अपेक्षित आहे,” असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनातील ‘समकालीन साहित्य चळवळी आणि बांधिलकी’ या परिसंवादात राजन खान बोलत होते. संविधाननागरी बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या परिसंवादात लेखिका प्रा. वंदना महाजन, ग्रामीण साहित्यिक प्रा. गणेश देशमुख, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते सुबोध मोरे, अनमोल शेंडे सहभागी झाले होते. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्षस्थानी होते.
राजन खान म्हणाले, “चळवळींच्या मांडणीच्या सुरुवातीलाच केंद्रस्थानी आंबेडकर आहेत. त्यांनी दिलेली ध्येय, धोरणे यावरच चळवळी उभ्या राहतात. देशाचा खरा झगडा हा डाव्या-उजव्याचा आहे. अडीच हजार वर्षांचा इतिहास पहिला तर नेहमी उजवी चळवळ यशस्वी होत आली. मात्र डावी चळवळ उगवते आणि विझते. ब्राह्मणी चळवळी नेहमी चालत राहतात. डावे सहिष्णू, सम्यक विचार मांडणारे आणि बहुसंख्य असले तरी उजवे असहिष्णू त्यांच्यावर सत्ता गाजवतात. कारण डाव्यांत एकोपा, एकवाक्यता नाही. त्यांच्यात नेहमीच काही फटी असतात आणि तेथून उजवे लोभ व लाभाचे विचार घेऊन शिरकाव करतात. शोषक आणि शोषित या दोघांनाही माणूस बनवणारा आंबेडकरी विचार आहे, पण आपण तो सोयीनुसार घेतो. हा विचार एकांगी, एककल्ली नाही. त्याचे तंतोतंत पालन करत कणखर आणि भक्कमपणे उभे राहणाऱ्यांची गरज आहे.”
नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, “वर्तमान परिस्थितीत लेखक काय भूमिका घेतात हे महत्वाचे आहे. आजची परिस्थिती निषेधार्य आहे; परंतु सामान्य माणसाला जोवर ते भिडत नाही, तोवर त्याचा उपयोग नाही. आणीबाणीत लोक सुरुवातीला घाबरले. नंतर हळूहळू सामान्य माणूस जागृत झाला, उभा राहू लागला. आता प्रश्न हा आहे की सामान्य माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोल किती वाटते. लेखक त्याचेच प्रतिनिधित्व करत असतो. सामान्य माणूस जोवर उभा राहत नाही तोवर बदल होत नाही. जागतिकीकरणाच्या काळात अनेक चळवळी संपल्या. जेंव्हा चळवळी सुरू असतात तेंव्हा साहित्य चळवळीलाही बळ मिळते. जागतिकीकरणातून मुख्य बदल जो झाला तो म्हणजे समाज बाजारात उभा झाला. विद्वान, मीडिया विकला जात आहे. त्यामुळे या काळात सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि मानवी मूल्य दिसत नाहीत. हे गंभीर आहे.”
वंदना महाजन म्हणाल्या, “संघाने संस्कृतिक चळवळीचा चेहरा घेऊन राजकीय चळवळ सुरू केली आणि सूत्र हाती घेतली. सगळी वाटचाल हिंदू राष्ट्र निर्मितीकडे आहे. साहित्य चळवळी या सामाजिक चळवळींशी निगडित आहेत. आजची परिस्थिती फार निराशाजनक आहे. फुले, शाहू, आंबेडकरांनी दिलेली वाट चालण्यास आपण अपयशी आहोत. जातीच्या वेगवेगळ्या समुदयातून साहित्याचे वेगवेगळे समुदाय तयार होत आहेत.” अनमोल शेंडे म्हणाले, “लेखक संवेदनशील असतो, तोच खऱ्या अर्थाने माणुसकीची बाजू मांडतो. आजवर अनेक प्रश्नांचा मूलभूत पातळीवरून विचार झालेला नाही. साहित्य चळवळीचा जन्म सहज होत नाही. लेखन भूमिकेच्या अनुषंगाने असावे लागते. भूमिका तेंव्हाच येते जेंव्हा विचार बांधिलकी मानणारे असतात.”
गणेश देशमुख म्हणाले, “कोणताही माणूस निःपक्षपाती नसतो. फक्त ज्या पक्षाकडून आहे त्याच्याशी बांधिलकी बाळगणे आवश्यक आहे. बांधिलकी म्हणजे कोणत्यातरी विचाराशी बांधले जाणे. विचारांचा खुलेपणा फार आवश्यक असतो. शेतकऱ्यांशी बांधिलकी ठेवत अनेक साहित्य येते आणि अजूनही येणे आवश्यक आहे.”
सुबोध मोरे म्हणले, “धर्मांध राजकारण प्रखर झाले आहे. त्याला दलित, ग्रामीण साहित्याने जेवढ्या क्षमतेने विरोध करायला हवा तेवढा केलेला नाही. या राजकारणाने जसे पाय पसरले, घुसखोरी केली ते समजण्यास आपण अपयशी ठरलो आहोत. देशातील वातावरण झुंडशाही आणि तुमची अभिव्यक्ती दडपणारे आहे. आज आणीबाणी नसली तरी आणीबाणी सदृश परिस्थिती आहे.”