पुणे व्यवसाय / अर्थ होम

गृहनिर्माण संस्थांच्या ‘स्वयं पुनर्विकासा’ साठी पुण्यात पहिले पाऊल !

Share news

पुणे :पुण्यातील जुन्या इमारतींच्या, ‘गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी  ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ या संस्थेकडून  ‘टुगेदर वी बिल्ड’ ही  व्यावसायिक सल्ला सेवा सुरु करण्यात  आली  आहे . त्यासंबंधी माहिती देण्यासाठी तसेच पुण्यातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी सद्यस्थिती सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या सल्लासेवेमुळे पुनर्विकासात  गृहनिर्माण संस्थांना जास्तीचे फायदे मिळणार आहेत.  
पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ चे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे, मकरंद केळकर यांनी संबोधित केले .  
पुण्यात ५ हजार हुन अधिक गृहनिर्माण संस्थांच्या इमारती ३० वर्षाहून जुन्या आहेत. जुने बांधकाम, पार्किंग ची अपुरी व्यवस्था ,लिफ्ट नसणे, देखभाल खर्च यामुळे पुनर्विकासाची आवश्यकता निर्माण झाली आहे . वाढीव एफएसआय चे गणित फायदेशीर नसल्याने , अनेकदा विकसकांनी दिलेला  प्रस्ताव पुरेसा न वाटल्याने , पारदर्शकतेवर शंका घेतली जात असल्याने या गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास रखडतो,  तसेच विविध शासकीय शुल्क व भांडवल उभारणीचा मोठा खर्च यामुळे पुनर्विकास प्रक्रिया किफायतशीर होत नाही. अशा वेळी  स्वयं पुनर्विकास हा पर्याय गृहनिर्माण संस्थापुढे आहे. 
सभासदांना तांत्रिक माहिती नसणे ,वेळ ,अनुभव नसणे यामुळे पुनर्विकास अवघड  होतो .या सर्व पार्श्वभूमीवर  ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ या बांधकाम क्षेत्रातील संस्थेकडून ‘गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी ‘टुगेदर वी बिल्ड’ ही व्यावसायिक सल्ला सेवा सुरु करण्यात  येत आहे.  
पुनर्विकासाची किफायतशीरता  (फिजिबिलिटी) सांगणे, भांडवल उभारणीत मदत, पालिकेकडून  आराखडे मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करणे, कंत्राटदारांची नियुक्ती करून उत्तम दर्जाचे काम करणे, सदनिका विक्री व्यवहार सांभाळणे, रेरा सारख्या कायद्यांची पूर्तता करणे अशा अनेक सेवा एकत्रितपणे एका छताखाली या सल्ला  सेवेद्वारे दिल्या जाणार आहेत . 
या सल्ला सेवेचा फायदा गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना आणि नवीन सदनिका विकत घेणाऱ्या ग्राहकांनाही होणार आहे. पारदर्शकपणे पुनर्विकास होणे हा गृहनिर्माण संस्था आणि सभासदांना मिळणारा  लाभ असेल, चांगल्या दर्जाचे बांधकाम मिळेल, वेळेची बचत होईल, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले . 

नव्याने सदनिका घेणाऱ्यांना रास्त भावात सदनिका आणि गाळे खरेदी करण्याची प्रक्रिया या सल्ला सेवेमुळे सुलभ होणार आहे . 
त्यासाठी हेल्पलाईन स्थापन करण्यात आली असून  ८८८८८३६५६४ या क्रमांकावर संपर्क  साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ ला प्रकल्प व्यवस्थापन, बांधकाम, सदनिका विक्री यांचा प्रदीर्घ अनुभव  असल्याने ही  सल्ला सेवा  सुरु करण्यात  येत आहे. या संस्थेचे  पुण्यातील एरंडवणा, कोथरूड, सहकार नगर, कात्रज इ. भागात पुनर्विकास प्रकल्प सुरु आहेत.