ठळक बातम्या लाईव्ह अपडेट्स होम

चाकणचे नगरसेवक राहुल कांडगे यांच्या मोटारीची तोडफोड,. सहा जणांवर गुन्हा दाखल,.

Share news

चाकण,   दि.   ( वार्ताहर ) –     बेकायदा गर्दी जमाव जमवून चाकण नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल किसन कांडगे यांच्या इनोव्हा गाडीची तोडफोड करण्यात आल्याची विचित्र घटना गुरुवारी ( दि. ७ मार्च ) रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.  याप्रकरणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी ( दि. ८ मार्च ) सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.     राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक राहुल किसन  कांडगे ( वय – ३७ वर्षे, रा. जय भारत चौक, चाकण, ता. खेड,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांडगे यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी रवी कुऱ्हाडे, प्रतीक सोनवणे, रवींद्र कळसकर, मोनेश घोगरे, प्रतिक जाधव, संदीप शिंदे, ( सर्व रा. चाकण, ता. खेड, जि.पुणे ) यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १४३, १४७, १४९, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.     याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वरील सर्वांनी संगनमताने चाकण गावच्या हद्दीतील मार्केट यार्ड शेजारील जय भारत चौकातील नगरसेवक राहुल कांडगे यांच्या राहत्या घरासमोरील भागात बेकायदा गर्दी जमाव जमविला होता. त्यानंतर नगरसेवक कांडगे यांच्या मालकीची इनोव्हा मोटारीच्या ( क्र. एम. एच. १४, ई. यु. ८०००) पाठीमागील काचेवर तुफान दगडफेक  करून काचा फोडल्या. त्याचप्रमाणे नगरसेवक कांडगे यांना शिवीगाळ, दमदाटी केली.  चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.—————————–    ” सदरचा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. सातत्याने माझ्यावर हल्ल्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामागे राजकीय षडयंत्र असून, यामागचा खरा खलनायक शोधून त्याच्यावर योग्य ती कडक व कायदेशीर कारवाई करावी. चाकण मधील काही गुन्हेगारी टोळक्यांचा शहरात मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढत चालला आहे. अशा टोळ्यांना काही जण शिताफीने वापरून घेत आहेत. संबंधित टोळ्या आता सामान्य चाकणकर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. या टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवायांना चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत.” – राहुल कांडगे,. नगरसेवक, चाकण