ठळक बातम्या होम

दोन गाव एक शिवजयंती

Share news

लोणी काळभोर – प्रतिनिधी – हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन मोठ्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन दोन गाव एक शिवजयंती करण्याचे ठरवले असून त्याची बैठक आज लोणी काळभोरचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरात अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.       या मध्ये सर्व जाती धर्मातील लोकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला आहे. या वेळी मुस्लिम समाज बहुसंख्येने मिरवणुकीत  सहभागी होणार असल्याचे जेष्ठ नेते रेहमान इनामदार यांनी सांगितले. या वेळी बोलताना राजेश काळभोर  म्हणाले आजकाल कुठल्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करताना दुचाकीच्या सायलेन्सरची पुंगळी काढून पन्नास – शंभर दुचाक्या वेगाने पळवल्या जातात. कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवून नाच केला जातो. हि खरी शिवजयंती नाही. त्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार अंमलात आणणे हि खरी शिवजयंती आहे.        यावेळी पंचायत समिती सदस्य  युगंधर काळभोर, कमलेश काळभोर, सुर्यकांत गवळी, देविदास काळभोर, चित्तरंजन गायकवाड, संतोष भोसले, दिलीप भोसले, संजय राखपसरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी आपापले राजकीय विचार बाजूला ठेवून शिवजयंती साजरी करण्यासाठी एकत्र यायचे असे यावेळी ठरविण्यात आले. कवडीपाट टोलनाका ते लोणी काळभोर गाव अशी पारंपारिक वाद्यात व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक  काढण्याचे नियोजन करण्यात आले. शिवजयंतीच्या दिवशी एखाद्या नामांकित शिवव्याख्यात्याचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी उपस्थित सर्वांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी दोन लाख रुपये वर्गणी अर्ध्या तासात गोळा केली. या वेळी मुस्लिम समाजाने पाच हजार रुपये वर्गणी जाहीर केली. यावेळी कदमवाकवस्तीचे उपसरपंच ऋषीकेश काळभोर,  ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काळभोर, भरत काळभोर, दिग्विजय काळभोर, विकास कदम, वाहिद शेख, रियाज शेख, शब्बीर पठाण व दोन्ही गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.